गेल्या काही दिवसांपासून राज्यात एक वेगळंच राजकारण पाहायला मिळत आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली. राणा दाम्पत्याला यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांच्याविरोधात १२४ अ हे राजद्रोहाशी संबंधित कलम लावल्याची माहितीही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे. “थोडक्यात उत्तर द्यावे. (उत्तर दिलेल्या पर्यायांमधून ल्एक किंवा सर्व पर्याय निवडून द्यावे). उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र आमचा ? १. वसूलीच्या ताब्यात, २ विकृत घाडीच्या ताब्यात, ३ लोड शेडिंगच्या ताब्यात, ४. ट्रॅफिक जॅम आणि अव्यवस्थेच्या ताब्यात, ५. गुंडांच्या ताब्यात,” असं म्हणत त्यांनी काही सवाल केले आहेत.
पोलिसांनी याच प्रकरणात राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस घेत होते. याप्रकरणी आता ६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच इतरांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.