"तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत, असा घणाघात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यादरम्यान भाजपवर (BJP) केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.
"सरकार पाडून दाखवा असं हे रोज म्हणतात. ज्या दिवशी सरकार पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही," अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे हे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. परंतु त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे? शिवसेनेकडे जेव्हा उमेदवार नव्हता त्यावेळी भाजपनं त्यांना उमेदवार दिला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
भाजप लोकशाही मार्गानं चालणारा पक्षसीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचा विरोधच आहे. ते या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षही घालत नाहीत. भाजप हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस सरकारच्या काळात जसा सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला तसा भाजप करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय शांतही बसणार नाहीत. परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी भीती बाळगावी आणि ज्यांनी केला नाही त्यांनी निश्चिंत राहावं. जर आम्ही संस्थांचा गैरवापर होत असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आता तुरुंगात असतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही"मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. कोलकात्याची आजची अवस्था काय आहे हे ठाऊक आहे का?, जो तुमच्या विरोधात बोलतो त्याचं मुंडकं छाटून फासावर लटकवायचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब आहे तोवर आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही," असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
इतिहासातलं भ्रष्ट सरकार"ज्या महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत आहात ते इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे हे लक्षात ठेवा. इतिहासात याची नोंद केली जाईल. तुमचा अजेंडा फक्त खंडणी.. खंडणी...," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणात संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. "काहीही झालं तरी संविधान कोणी बदलू शकणार नाही. काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन काही डाव्या विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन हा मनसुबा रचला जातोय. तुमचा मनसुबा कधीही पूर्ण होऊ दिला जाणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.