केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काल दिवसभर राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं झाली. यात राणेंना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांची जामीनावर सुटका झाली. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. या कारवाई प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
युवासैनिकांना शाबासकीमुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. यात राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.
आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई कार्यकर्त्यांसह राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन घोषणाबाजी करत होते. यात पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान काही कार्यकर्ते देखील जखमी झाले होते. दरम्यान, युवासेनेच्या याच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची रात्री उशिरा भेट घेतली. वरुण देसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन केलेल्या युवासैनिकांचं पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे.