पुणे - मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसला आहे. ठाकरे गटातून शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्यांची रिघ लागली आहे. त्यातच पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. धंगेकरांनी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.
या भेटीनंतर रवींद्र धंगेकर सेनेत प्रवेश करतील अशी चर्चा माध्यमातून सुरू झाली. त्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, माझ्या वैयक्तिक कामासाठी मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. मी सरकारी बंगल्यात भेटलो, लपून भेट घेतली नाही. माझं काम होते, ते करायला गेलो होतो. कामासाठी गेलो आणि भेटून आलो. त्यांच्याकडे गर्दी होती, त्यातून मला २ मिनिटांचा वेळ दिला, मी भेटलो आणि माझ्या कामाची चर्चा केली. काही माध्यमांनी आजच मी प्रवेश करणार अशी बातमी लावली. काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्याला जनाधार आहे. शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे भेटलो. लोकांच्या कामासाठी भेटावेच लागते असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकारणात एकमेकांना भेटू शकत नाही का, कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होत असतात. माझं काम निघलं तर मुख्यमंत्र्यांकडे जावे लागेल. पण सध्या त्यांच्याकडे काही काम नाही. याआधीही मी शिंदेंना भेटलो आहे. माझ्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली नाही. मी काँग्रेसमध्ये आहे. वरिष्ठ जे निर्णय घेतात ते पाळावे लागतात. मी पक्षात आहे त्यामुळे काम करत आहे. मी कोणाचा प्रचार करायचा हा विषय नाही. मी माझ्या कामावर ठाम आहे. माझ्याकडे लढायची ताकद नेहमी असते. माझ्या काही अडचणी होत्या त्यासाठी मला मदत मागावीच लागणार असंही सूचक विधान रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
ठाकरेंचे माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार
दरम्यान, पुण्यातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर नाराज होते.