लोकमत न्यूज नेटवर्कठाणे / मुंब्रा : गेल्या चार वर्षांपासून बांधकाम व्यवसायातील तोट्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या समद कुरेशी (३८) या मुंब्य्रातील बांधकाम व्यावसायिकाने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. काँग्रेसच्या माजी नगरसेविका शकिला कुरेशी यांचे ते पुत्र होते.अमृतनगर येथील ईशानगर भागातील ‘केजीएन’ अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील ४०६ क्रमांकाच्या सदनिकेत समद वास्तव्याला होते. पत्नी स्वयंपाक करण्यात व्यस्त असताना, समद यांनी अचानक पाचव्या मजल्यावरील त्यांच्याच पत्र्याच्या शेडमधील पंख्याला ओढणीने दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून घेतला. त्याच दरम्यान, त्यांची पत्नी त्यांना बोलावण्यासाठी गेली असता, त्यांना पतीने गळफास घेतल्याचे आढळले. त्यांनी जवळच राहणाऱ्या अब्दुल अजीज या मेहुण्याला हा प्रकार सांगितल्यानंतर पोलीसही घटनास्थळी आले. समद यांनी गेल्या तीन दिवसांमध्ये दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची नातेवाईकांनी समजूतही घातली होती. रविवारी मात्र, पुन्हा सर्वांची नजर चुकवून अखेर आत्महत्या केली.लकी कम्पाउंड दुर्घटनेमुळे तोटालकी कम्पाउंडमधील ‘आदर्श बी’ ही इमारत कोसळून एप्रिल २०१३ मध्ये ७४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, ठाणे महापालिकेने या परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर कडक निर्बंध आणले. समद यांचाही अनेक ठिकाणच्या बांधकामांमध्ये पैसा गुंतला होता, परंतु बांधकामे थंडावल्यामुळे त्यांची विक्रीच होत नव्हती. त्यात अनेकांकडून त्यांनी उसनवारीने, तसेच कर्जाऊ पैसे घेतले होते. त्यातील काहींनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता, तर काहींनी त्यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या.
माजी नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या
By admin | Published: May 29, 2017 4:41 AM