मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव हे पाच वर्षाच्या कार्यकाळात तब्बल २१४ वेळा प्रवास दौरे काढले. त्यासाठी एकुण ४५ लाख रुपये खर्च झाला असल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यांनी सर्वाधिक ८३ वेळा हैदराबादला तर २२ वेळा चेन्नईला दौरे काढले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयतर्गंत राजभवनाकडे विद्यासागर यांच्या पाच वर्षातील परदेश व देशातील विविध दौरे आणि तेथील निवासाच्या खर्चाबाबत विचारणा केली होती. त्याबाबत देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. विद्यासागर राव यांनी ५वर्षात परदेशात एकदाही प्रवास केलेला नाही. त्याचप्रमाणे राज्यपालांना राज्य व भारत दौºयासाठी राज्य अतिथीची सुविधा दिली जात असल्याने त्यांच्याकडे निवास खर्च घेतला जात नाही. त्यांच्या २ जानेवारी २०१५ ते ३ सप्टेंबर २०१९ या ५७ महिन्यांत हवाई, सागरी व रस्ते प्रवासावर एकूण ४५ लाख ३ हजार ६५१ रुपये खर्च झाले आहेत. त्यांचा बहुतांश प्रवास विमानाने झाला असून एकुण २१४ वेळा केला आहे. त्यापैकी ८३ वेळा प्रवास हा केवळ हैदराबाद येथील आहे. तसेच २२ वेळा चेन्नईला तर, विजयवाडा, अमरावती आणि तिरुपती याठिकाणी काही वेळा प्रवास केला आहे.
आरटीआयच्या माहितीनुसार, सुरुवातीस ३ वर्षे राव यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. २०१५ मध्ये ५४ वेळा तर २०१६ मध्ये ५३ आणि २०१७ मध्ये ४९ वेळा प्रवास केला आहे. २०१८ व २०१९ मध्ये अनुक्रमे ३६ व २२ वेळा प्रवास केला आहे. या प्रत्येक कालावधीत राव हे ३ ते १५ दिवस ते राज्याबाहेर होते.