मुंबई-राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते.
पालिकेकडून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला असून अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान गेल्या आठ दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे सावंत यांनी दि. 16 जानेवारी व दि. 16 फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे डोस घेतले होते. एक महिन्यापूर्वी त्यांच्या शरीरात 268 अँटीबॉडीज होत्या. तरी पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने बूस्टर डोस घेण्याच्या आवश्यकते बाबत आयसीएमआरने निकष ठरवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. दीपक सावंत यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. मळम कोरोनाची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी दि. 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणार होता. मात्र सदर कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकात कोरोना विषयक देशाच्या आणि जागतिक स्तरावर कोरोना विषयक लेखाजोखा त्यांनी मांडला आहे. तसेच लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख आणि कोरोना विषयक बातम्यांचादेखील या पुतकात समावेश आहे.