मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वैदी यांचं अपहरण केल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी केलं आहे. १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी अनिल देशमुख यांची सध्या ईडीकडे चौकशी सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. त्याच दरम्यान अनिल देशमुख यांचे जावयाचं अपहरण झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे.
अनिल देशमुख यांच्या सूनेकडून अशाप्रकारे गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांच्या वरळी निवासस्थानाबाहेर ८ ते १० लोकांनी जावई गौरव चतुर्वैदी यांना एका गाडीत बसवून निघून गेले. याबाबत राहत देशमुख म्हणाल्या की, आमच्या घराबाहेरुन वकील आणि दाजी यांना ८ ते १० लोकांनी गाडीत बसवून घेऊन गेले. ते कुठे गेले, काही फोन कॉल्स नाही. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचं राहत देशमुख यांनी सांगितले आहे.
गौरव चतुर्वैदी यांना कुणी ताब्यात घेतलंय याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. सफेद रंगाची इनोव्हा गाडी असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. कुठलीही नोटीस न देता अशाप्रकारे अज्ञातांनी गाडीत बसवून घेऊन गेले. त्यामुळे अनिल देशमुख कुटुंबाने वरळी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. गौरव चतुर्वैदी हे अनिल देशमुखांचे जावई आहे. ईडी(ED), सीबीआयकडून(CBI) त्यांना ताब्यात घेतलं असावं अशी शक्यता आहे. परंतु कुठलीही माहिती न देता अशाप्रकारे कारवाई करणं योग्य आहे का? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर ईडी, सीबीआयनं ताब्यात घेतलं असेल तर आम्ही त्यावर कायदेशीर उत्तर देऊ असं अनिल देशमुख कुटुंबियांनी सांगितले आहे.
देशमुखांना कथित ‘क्लीन चिट’ देणाऱ्या व्हायरल अहवालावरून राजकीय धुरळा
दरमहा शंभर कोटी वसुलीच्या आरोपाबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग नसल्याचा सीबीआयचे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांचा ६५ पानी अहवाल सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. अहवालाबाबत सीबीआयने कानावर हात ठेवले असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष्य करत हा कट असल्याचे उघड झाले असून आता सत्य समोर येत असल्याचा दावा केला, तर भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेत थेट समोर न येता, तपास अजून पूर्ण व्हायचा असल्याचे सांगितले. व्हायरल अहवालावर गुंजाळ यांची स्वाक्षरी नाही. सीबीआयच्या प्रवक्त्याने देशमुख यांना ‘क्लीन चिट’ दिली नसल्याचे सांगत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र, फुटलेला अहवाल खरा की खोटा, यावर सीबीआय संचालकांनी भाष्य केले नव्हते.