Shyam Manav ( Marathi News ) : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडकवण्यासाठी भाजपने गृहमंत्रिपदावर असलेल्या अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. मात्र देशमुख यांनी ती ऑफर न स्वीकारता १३ महिने तुरुंगात राहणं पसंत केलं," असा खळबळजनक दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. मानव यांच्या या दाव्याला अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे.
श्याम मानव म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं आणि मला गुटखेवाल्यांकडून वसुली करण्याची सूचना दिली. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हेदेखील होते, असं अनिल देशमुख यांना प्रतिज्ञावर लिहून देण्यास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र देशमुख यांनी असं करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून अटक करण्यात आली. त्यांनी भाजपची ऑफर नाकारल्यामुळे मी त्यांचं जाहीरपणे कौतुक करतो," असा दावा मानव यांनी केला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी अजित पवारांना अडकवण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठी दबाव होता, असा दावाही श्याम मानव यांनी केला.
श्याम मानव यांच्या या दाव्यावर भाजपच्या गोटातून अद्याप प्रतिक्रिया आली नसून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी मात्र या दाव्याला दुजोरा दिला आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
"श्याम मानव सांगत आहे ते खरं आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून सांगितलं होतं की, तुम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्यावर आरोप करा. मात्र तसं करण्यास मी नकार दिला," असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे.