भारताचे माजी लष्करप्रमुख आणि सध्या चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावर कार्यरत असलेल्या बिपीन रावत यांनी आज राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान बिपीन रावत यांनी संभाजीराजे यांच्या कार्यलयातील असणाऱ्या महाराणी ताराबाई साहेब यांच्या फोटोकडे बोट दाखवत या योध्या महिला कोण आहे अशी विचारणा केली.
बिपीन रावत यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, पण 'या घोड्यावर बसलेल्या योध्या महिला कोण आहे' असा प्रश्न संभाजीराजे यांना विचारला. बिपीन रावत यांनी विचारलेल्या प्रश्नावर संभाजीराजे यांनी ताराबाई साहेब यांच्या संपूर्ण इतिहासाची माहिती दिली. संभाजीराजे म्हणाले की, आपल्या देशात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची माहिती जाणीवपूर्वक बरीच सांगितली गेली. त्यांच्या शौर्याला सुद्धा मानलं पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची सून असलेल्या ताराबाई साहेबांचा इतिहास लोकांच्या समोर सांगितला गेला नाही.
अल्पावधीत तीन छत्रपतींच्या मृत्यूमुळे मराठा साम्राज्याला जबरदस्त धक्का बसला होता. त्यावेळी खऱ्या अर्थाने स्वराज्यावर छत्र धरण्याचे कार्य ताराबाई साहेब या रणरागिणीने केले. औरंगजेबासारख्या शक्तिशाली बादशहासमोर ही रणरागिणी सलग 7 वर्ष लढा देत उभी होती. औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच आपली कबर खोदवी लागली. अश्या या महान कर्तबगार स्त्रिचा देशपातळीवर उचित गौरव केला गेला नाही असे संभाजीराजेंनी यावेळी बिपीन रावत यांना सांगितले.
ताराबाई साहेबांची माहिती जाणून घेताच बिपीन रावत यांनी एक इच्छा व्यक्त केली. आमच्यासाठी आज नवीन प्रेरणास्थान ठरलेल्या महाराणी सोबत फोटो घ्यायचा आहे असं बिपीन रावत संभाजीराजेंना म्हणाले. या सर्व प्रकरणाची पोस्ट संभाजीराजे यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.