प्रशांत ननवरे- बारामती : कोरोनाच्या विरोधात या लढाईमध्ये आता माजी सैनिक 'कोरोना वॉरियर्स' च्या रुपात रस्त्यावर उतरले आहेत. बारामती शहरात आता पोलीस आणि माजी सैनिक साथ साथ कोरोना विरोधी मोहिमेत उतरले आहे.त्यामुळे आता पोलिसांच्या दराऱ्याला सैनिकांच्या शिस्तीची साथ मिळाली आहे.साहजिकच त्यातुन खाकीला बळ मिळाले आहे.पोलिसांचा खाकी आणि माजी सैनिकांचा चित्ता ड्रेस नागरिकांना कोरोनाला अनुकुल वातावरण निर्मिती करणाऱ्या नागरिकांना शिस्तीचे धडे देणार आहेत.सध्या कोरोनाच्या विरोधी लढाईत सर्वसामान्यांपासून ते ज्येष्ठ पर्यंत सर्वजण उतरले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवक, आरोग्य सेवक कार्यरत आहेत. पोलिसांचे देशातील योगदान पाहता शहरातील जय जवान आजी माजी सैनिक संघटना कोरोना वॉरियर्सच्या रुपात उतरली आहे.या लढाईमध्ये शहरातील रस्त्यावर पोलिसांच्या बरोबर माजी सैनिक दिसु लागले आहेत.बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशन ला ४२ माजी सैनिक कार्यरत होणार आहेत. पोलिसांबरोबर बंदोबस्त करणे,चेक पोस्ट,नेमून दिलेल्या ठिकाणी नागरिकांना मदत करणे, आदी जबाबदारी माजी सैनिकांनी घेतली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत. शत्रुच्या विरोधातील लढाईनंतर आता देशाचे हे निवृत्त सैनिक निवृत्तीनंतरदेखील देशसेवेसाठी पुढे सरसावले आहेत. पोलीस प्रशासनाने बारामती शहर आणि तालुक्यामध्ये विविध ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली आहे . उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,पोलीसनिरीक्षक औदुंबर पाटील,पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आदींच्या मार्गदर्शन खाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतेच माजी सैनिकांना कोरोना वॉरियर्स चे ओळखपत्र देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.व्ही. शेंडगे आणि बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर आणि ४२ माजी सैनिक याप्रसंगी उपस्थित होते.या उपक्रमाबाबत माजी सैनिक राहुल भोईटे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले कि, कोरोनाच्या लढाईत संपुर्ण देशात पोलीस बांधवांचा सहभाग कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. देशात हरियाणामध्ये देखील हा प्रयोग करण्यात आला आहे. केवळ देशहित जोपासणाऱ्या पोलीस बांधवांच्या प्रेरणेतुन आम्ही सर्व माजी सैनिक या उपक्रमात सहभागी झालोआहे.यामध्ये सकाळी ९ ते १ ,सायंकाळी ४ ते ८ या वेळेत पोलिसांसमवेत नाकाबंदी आदी ठिकाणी पोलिसांना मदत करणार आहेत. देशविरोधी शत्रुंना मात देणारे माजी सैनिक कोरोना विरोधी लढाईत निश्चित यशस्वी होतील,असा विश्वास भोईटे यांनी व्यक्त केला.
राज्यातील पहिला प्रयोग! बारामतीत पोलिसांसह माजी सैनिक बनले 'कोरोना वॉरियर्स'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 8:25 PM
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत..
ठळक मुद्देबारामती शहर तालुक्यात पोलीस ,माजी सैनिक साथसाथदेशात हरियाणामध्ये देखील हा प्रयोग; माजी सैनिकांना कोरोना वॉरियर्स चे ओळखपत्र