मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार, पक्षप्रवेश आजच होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 08:34 AM2024-02-13T08:34:20+5:302024-02-13T08:36:21+5:30
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार आहेत.
आज दुपारी साडेबारा वाजता भाजपाच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. तसेच, अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून ४८ तासांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, आज अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील इतर आमदारही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता
अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी १५ फेब्रुवारी रोजी होणार होता. पण अचानक घाईघाईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. राज्यसभेसाठी नामंकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आली आहे, त्यामुळे राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. तसेच, अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकतात. ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपाचा अतिरिक्त उमेदवाराचा विजय होईल. तसेच यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.