मुंबई : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील आणि त्यांच्या स्नुषा योगिता पाटील यांनी सोमवारी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेतून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या हरेश्वर पाटील यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि मुंबईचे महापौर पदे भूषविले होते. काही वर्र्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, योगिता पाटील यांनी उत्तर मुंबई जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा म्हणून काम पाहिले होते. आज हरेश्वर पाटील यांच्या सर्व कुटुंबीयांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सातत्याने डावलण्यात येत असल्याने पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ नेत्यांकडे गाऱ्हाणी मांडूनही दखल घेण्यात न आल्याने नाराज झालेल्या पाटील यांनी भाजपाचा रस्ता धरला. पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, संघटन मंत्री सुनील कर्जतकर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माजी महापौर हरेश्वर पाटील यांचा भाजपात प्रवेश
By admin | Published: August 23, 2016 2:03 AM