मुंबई - उबाठा गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार संजय पवार आणि आरपीआयचे नगर जिल्ह्याध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. पाचवेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेची नाशिकमधील ताकद आणखी वाढली आहे.
बाळासाहेब भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजासाठी भरीव काम केले आहे. समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठपुराव्याने सरकारने अनेक निर्णय घेतले. मुंबईत आयएएस आयपीएस विद्यार्थ्यांसाठी २०० कोटींचा निधी भवन उभारणीसाठी उपलब्ध केला. समाजाला न्याय देण्यासाठी बबनराव घोलप यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने चालणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला. बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम आपल्या सरकारने केले. वेळेप्रसंगी आपण नियम बदलले, कायदे बदलले. सर्वसामान्यांना चांगले दिवस यावेत म्हणून हे सरकार काम करत आहे. लोकांना हे आपलं सरकार असल्याची प्रचित येते. राजस्थानचे आणखी दोन आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारची घोषणा केली आहे आणि लोकांनी त्याची गॅरंटी घेतली आहे. बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आरोपांच्या पिंजऱ्यात दुसऱ्याला उभे करायचे आणि स्वत: नामानिराळे राहयचे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर गेली.
शिवसेनेत ५४ वर्ष काम केले. दोन महिन्यांपूर्वी उपनेते पदाचा राजीनामा दिला मात्र उबाठा गटातून साधी विचारपूस झाली नाही, अशी खंत बबनराव घोलप यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे उत्साहाने काम करतात. त्यांना मदत करण्याची आवश्यक असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले. माजी आमदार संजय पवार म्हणाले की, कुठल्या तिकिटासाठी शिवसेनेत आलेलो नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. मनमाड शहराचा पाणी प्रश्न, एमआयडीसा प्रश्न आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला. त्यामुळे मी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहे.
कोण आहेत बबनराव घोलप?
बबनराव घोलप राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. उबाठा गटाने बबनराव घोलप यांना संपर्क प्रमुख पदावरुन हटवल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. नाशिक देवळाली विधानसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते.
कोण आहेत संजय पवार?
संजय पवार यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होते. संजय पवार यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषवले आहे. नांदगाव, मनमाड भागात संजय पवार यांना मानणारा मोठा शेतकरी वर्ग आहे. संजय पवार मूळचे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. ते २००४ ते २००९ या काळात शिवसेनेचे आमदार होते. संजय पवार शिवसेनेत आल्याने नांदगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.
आधी लगीन कोंढाण्याचे, मग...
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे या विचाराने शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेत प्रत्येक मतदारसंघात एका पेक्षा एक सरस उमेदवार आहेत. ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्यांचा योग्य सन्मान राखू, कोणावरही अन्याय होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.