मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. या निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे महाविकास आघाडीला फटका बसला. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड निवडून आले. या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले.
यातच आता चंद्रकांत हंडोरे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हंडोरे यांनी त्यांच्या ‘भीमशक्ती महाराष्ट्र राज्य ’ संघटनेची राज्यव्यापी चिंतन बैठक बोलावली असून यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यातील मागासवर्गीय बहुजनांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. याबाबत चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, महाराष्ट्रातील भीमशक्तीची चिंतन बैठक बोलावली. मागासवर्गीयांचे बहुजनांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आजची बैठक झाली. कोरेगाव भीमा आंदोलनात ४० हजार केसेस कार्यकर्त्यांवर पडल्या. नांदेडमधील कार्यकर्त्याला ५ वर्ष शिक्षा सुनावली त्यामुळे ते जेलमध्ये आहेत. कार्यकर्त्यांवर दरोड्याच्या केसेस टाकल्या जातात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. रमाई घरकुल योजना ठप्प पडली. सामाजिक न्याय विभागाचं बजेट इतरत्र वळवण्याचा प्रयत्न होतोय अशा विविध प्रश्नांवर आगामी काळात काय भूमिका घ्यायची याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच गेली ५० वर्ष रस्त्यावरची लढाई करत मी इथंवर आलोय. अन्यायाविरोधात लढलो. पक्षाने दोनदा आमदार बनवले, मंत्री बनवलं. विधान परिषदेचे तिकीट दिली. त्याबद्दल पक्षाचे आभार आहोत. परंतु पक्षातील काही लोकांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे माझा पराभव झाला. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहे. ज्यांनी माझ्याविरोधात मतं दिली त्यांच्याविरोधात राहुल गांधींकडे तक्रार दिली आहे. पक्षनेतृत्वानेही तात्काळ याची दखल घेत निरीक्षक पाठवून अहवाल बनवला आहे. ज्या कुणी पक्षाविरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे असंही चंद्रकांत हंडोरे म्हणाले.
शिंदे गटात जाणार का? हंडोरे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर काँग्रेसनं मला सगळं काही दिले आहे. त्यामुळे या चर्चांना अर्थ नाही. अशाप्रकारे खोडसाळ वृत्त समोर आले आहे. मी काँग्रेसमध्ये आहे असं स्पष्टीकरण चंद्रकांत हंडोरे यांनी 'लोकमत ऑनलाइन'शी बोलताना दिले.