जळगाव : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील एका पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार देऊ नये यासाठी दबाव आणल्याबद्दल माजी मंत्री डॉ. हेमंत भास्कर देशमुख यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीवर अत्याचार करणाºया अज्ञात व्यक्तीविरुद्धही बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचालित नूतन माध्यमिक विद्यालयात पीडित मुलगी बालवाडीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांची ही शाळा आहे. ८ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी शाळेत गेली असता मधल्या सुटीत पायरीवर बसून जेवण करीत असताना एका अनोळखी इसमाने चॉकलेट देऊन शाळेच्या मागील बाजूस तिच्यावर अत्याचार केला.सदर घटना तिने आईला सांगितल्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन शिक्षिकेला जाब विचारला असता तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगून धमकावले. माजी मंत्री डॉ. हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, शिक्षक महेंद्र आधार पाटील, प्रतीक शरद महाले व नंदू गुलाब सोनवणे यांनी तुमची व आमची बदनामी होईल, तुम्हाला दवाखान्याचा खर्च देऊ, असे सांगून तक्रार न देण्यासाठी दबाव टाकला, असेही पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:55 AM