मलकापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भास्करराव ज्ञानोबा शिंदे (वय ८१, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सोमवारी रात्रीपासुन त्यांच्यावर कोल्हापूरमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मलकापूरचे विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे ते वडील होत.मंगळवारी दुपारी मलकापूर येथे काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी गोकाक पाणीपुरवठा संस्थेमागील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भास्करराव शिंदे हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांचे निष्ठावंत होते. स्वातंत्र्य लढा व गोवा मुक्ती संग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९८२ ते ९४ असे सलग बारा वर्षे विधान परिषदेवर ते आमदार होते. त्यांनी मलकापूर शहरासह तालुक्यातील विविध विकासकामांचा वेग वाढविला. (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलमलकापूरसाठी राबविण्यात आलेली २४ तास पाणी योजना हा भास्करराव शिंदे यांच्या विकासाच्या संकल्पनेतील एक मैलाचा दगड ठरला. या योजनेचे देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले. कऱ्हाड तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मलकापूर शहराच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले.
माजी आमदार भास्करराव शिंदे यांचे निधन
By admin | Published: December 02, 2014 10:18 PM