ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 19 - रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
कै. कडू पाटील यांच्या मागे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, अॅड. विजय आणि डॉ. विलास हे तीन मुले आणि चार मुली असा परिवार आहे. सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब थोरात यांचे कै. कडू हे व्याही होत. कै. कडू पाटील यांनी विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. १९४२ च्या महात्मा गांधी यांच्या चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला.
त्यांच्यासोबत अण्णासाहेब शिंदे,धर्माजी पोखरकर, भाऊसाहेब थोरात, पी. जी. भांगरे, माजी खा. चंद्रभान आठरे पाटील, रावसाहेब शिंदे असे अनेक सहकारी होते. स्वातंत्र्य चळवळीत कै. कडू पाटील यांचा एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, साने गुरुजी यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. कॉम्रेड डांगे यांच्यावरील मीरत व महाराष्ट्र खटल्यात ते सहआरोपी होते. स्वातंत्र्यचळवळीनंतर त्यांनी बडोदा आणि पुणे येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर राहुरी येथे त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. या काळात त्यांनी शेतकरी, शेतमजुर,आदिवासी यांची आयुष्यभर वकिली केली. आशिया खंडातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत कै. धनंजयराव गाडगीळ यांच्यासह कै. कडू पाटील यांचाही सहभाग होता. ते कारखान्याचे काही काळ अध्यक्षही होते.