मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे २ दिग्गज नेते गळाला लावल्यानंतर आता पवारांचा मोर्चा ठाणे जिल्ह्याकडे निघाला आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. त्यात आज माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी इच्छुक असल्याचं दिसले.
ओमी कलानी आणि पंचम कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर उल्हासनगर विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी आज पक्षाच्या कार्यालयात कलानी यांचा मुलगा आणि सूनेने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने कल्याण डोंबिवली लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर पाठिंबा देत प्रचारात उतरले होते. याठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांचा या मतदारसंघात पराभव झाला. मात्र लोकसभेनंतर आता विधानसभेत कलानी यांनी वेगळी भूमिका घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शरद पवारांचीही घेतली होती भेट
काही दिवसांपूर्वी माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जात शरद पवारांची भेट घेतली होती. जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून ही भेट घडली होती. यंदाच्या निवडणुकीत ओमी कलानी उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर लढण्याची त्यांनी पवारांकडे इच्छा व्यक्त केली. त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिल्याचे समोर येत आहे.
उल्हासनगरात कलानी कुटुंबाचं वर्चस्व
कधीकाळी कलानींचा बालेकिल्ला असणारा उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या कुमार आयलानी यांनी त्यांचे वर्चस्व मोडून काढले. कलानी गटाने भाजपाला महापालिका सत्तेपासून दूर ठेवले त्यामुळे भाजपासोबत कलानी कुटुंबाचा वाद आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळे कलानी कुटुंबाने लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. आता कलानी विधानसभेला राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी करत आहेत.