मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पण महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांच्याबद्दल एक विधान केले होते. यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. 'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. त्यांच्याकडे कुठलेही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला', असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते.
दरम्यान, गोपीचंद पडळकरांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापले आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गोपीचंद पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा व चोप देण्याचा इशारा दिला होता. यानंतर भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व प्रवीण दरेकर यांनी गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य चुकीचे आहे. त्यांच्या मताचा भाजपाशी संबंध नसल्याचे सांगत ते याप्रकरणी स्पष्टीकरण देतील सांगितले आणि यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी प्रतिइशारा दिला आहे. 'पडळकरांच्या त्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्यांच्या अंगावर कोणी जाणार असेल तर लक्षात ठेवा. आम्हाला धमक्या देऊ नका. जशास तसे उत्तर देऊ,' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
याचबरोबर, 'मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत,' याची आठवण नीलेश राणे यांनी करून दिली आहे. याशिवाय, 'राष्ट्रवादीवाल्यांकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. पण आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो,' असेही नीलेश राणे यांनी म्हटले आहे.