भाजपा खासदारासह मनसेचा माजी आमदार काँग्रेसच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:28 AM2018-11-29T06:28:51+5:302018-11-29T06:29:07+5:30
उमेदवारीसाठी मनधरणी : मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात नापास झाल्याचा धसका
- नारायण जाधव
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भाजपाच्या एका खासदारासह मनसेचा एक माजी आमदार काँगे्रसच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. भाजपाच्या एका मोठ्या ग्रामीण नेत्यासोबत त्याने काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तीन वेळा भेटही घेतली आहे.
ओसरलेली मोदी लाट, राफेलवरून पक्षाची मलीन होत असलेली प्रतिमा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्वेक्षणात हा खासदार कामगिरीत नापास ठरल्याने पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद वाढली असून शिवसेनेने स्वबळाचा नारा प्रत्यक्षात आणण्याचा या खासदाराने चांगलाच धसका घेतला आहे. उमेदवारी मिळावी, या हेतूने या खासदाराने काँगे्रसच्या श्रेष्ठींशी संधान बांधले असून त्यांच्यासोबत कल्याण-डोंबिवलीतील मनसेचा एक माजी आमदारही काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा विद्यमान खासदार काँगे्रसमध्ये गेल्यास तो भाजपाला मोठा धक्का असेल. यापूर्वी त्याने राष्ट्रवादीत ‘स्वगृही’ जाण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी होकार दर्शवला होता. परंतु, अजित पवार यांनी नकार दिल्याने त्याने लागलीच अशोक चव्हाण यांच्याशी संधान साधल्याची चर्चा आहे. भिवंडीसह शहापूर आणि पालघरच्या वाडा परिसरात या खासदाराचा चांगलाच दबदबा आहे. गोदामपट्ट्यातही त्याचा चांगलाच जम असून तेथील उद्योजकांच्या माध्यमातून व्यापारीवर्गात दबदबा आहे. शिवाय, ठाणे जिल्हा परिषदेसह जिल्हा बँकेशी त्याची चांगलीच जवळीक असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सर्वपक्षीय ग्रामीण नेत्यांशी चांगलाच घरोबा आहे.
मात्र, त्याला भिवंडीतील काँगे्रस नेते सुरेश टावरे, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, राजेश घोलप यांच्यासह मुस्लिम नेत्यांची त्यांना मनधरणी करावी लागणार आहे. कारण, या मंडळींनी त्यास काँगे्रसमध्ये घेण्यास तीव्र विरोध केला आहे. यामुळे विधानसभा व लोकसभा टावरे आणि मी वाटून घेऊ असाही पर्याय त्याने दिल्याचे सांगण्यात येते.
दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीतील मनसेचा एक माजी आमदारही काँगे्रसच्या संपर्कात आहे. तेथील ग्रामीण भागातील २७ गावांत या आमदाराचे चांगलेच वजन आहे. या भागात राष्ट्रवादीच्या मदतीने काँगे्रसकडून उमेदवारी मिळवण्याचा हा आमदारही प्रयत्न करत आहे. या आमदाराचे नातलग राज ठाकरेंच्या मनसेत असून त्यांची मदत आपल्याला ग्रामीण भागात मिळू शकते, असा त्यांचा दावा आहे.
राष्ट्रवादीत घेण्यास अजित पवारांचा नकार
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशीही त्याचे चांगलेच सूत असल्याने राष्ट्रवादीकडून त्यास निवडणुकीत चांगलीच मदत होऊ शकते. किंबहुना, तो पूर्वी नाईकांचा ‘खास माणूस’ म्हणूनच परिचित होता. नाईक यांचे भिवंडी, शहापूर, मुरबाड भागांत चांगलेच राजकीय वजन आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास आपण निवडून येऊ शकतो, असा विश्वास त्याने काँगे्रस नेत्यांना दिल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रवादीत ‘स्वगृही’ जाण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी होकार दर्शवला होता. परंतु, अजित पवार यांनी नकार दिला.