ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ - महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने अटक केल्याचे पीटीय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. आज दुपारी १ पासून समीर यांची इडीकडून चौकशी सुरु होती, ९ तासाच्या चौकशीनंतर त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे भुजबळ कुंटुंबीयांविरुद्ध कारवाईचा फास आवळ्लयाचे दिसते आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर आज सक्तवसुली संचालनालयाकडून पुन्हा छापे मारण्यात आले आहेत. छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आले आहेत.
सक्तवसुली संचालनालयाच्या वरीष्ठ अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांची टीम छाप्यांमध्ये सहभागी आहे. तसेच भुजबळांच्या फक्त मुंबईतल्याच मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत तपास संपवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. याआधी छगन भुजबळ यांनी आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करत कायद्याच्या मार्गाने आपण लढू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
ED arrests former MP Sameer Bhujbal, nephew of NCP leader Chhagan Bhujbal, in money laundering case in Mumbai.— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2016