शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यानंतर शिवसेनेकडून ते पक्षातच असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर आढळराव पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला.
“अनेकांनी मला सकाळपासून यासंदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केले. मला क्षणभर काही कळेना. मला वाटलं कोणीतरी मजा करत आहे. मला विश्वास बसत नव्हता शिवसेनेनं माझी हकालपट्टी केली आहे. नंतर मी सामना पेपर वाचला. त्यात बातमी वाचल्यावर मला शॉक बसला. काही बोलावं, काय प्रतिक्रिया द्याव्या हे समजेनासं झालं,” असं आढळराव पाटील म्हणाले.
“काल रात्रीच मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना मतदारसंघातील काही कार्यकर्ते भेटायला येणार आहेत हे त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे आज सकाळची त्यांची वेळही घेतली होती. परंतु आज जनता दरबार असल्यानं जमणार नसून दोन दिवसांनी भेट घेईन असंही सांगितलं. तुम्ही जी पोस्ट केली ती खुप व्हायरल झाली आणि त्याचं मला वाईट वाटलं असं त्यांनी मला सांगितलं. या पोस्टमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं त्यात चूक केली असं काही वाटत नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनीही जे झालं ते झालं असं म्हणत मंगळवारी भेटण्यास सांगितलं,” असंही त्यांनी नमूद केलं.
१८ वर्ष तुम्ही शिवसेनेत असताना अनेकदा तुम्ही पक्षातून जाताय अशा चर्चा सुरू होत्या. पण तुम्ही गेला नाहीत, याचा मला अभिमान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. मागील चार पाच दिवसांपासून वातावरण तापल आहे. पण माझं काय चुकलं? मी काय कमी केलं पक्षासाठी? माझ्यावरच कारवाई का? कोणीतरी काहीतरी आरोप करायचा. अनेकांनी पोस्ट लिहिली, मग माझ्यावरच कारवाई का? १८ वर्ष या मतदार संघात कोणी नसताना मी राष्ट्रवादीची लढतोय. समर्थपणे त्यांना अंगावर घेतलं, त्याचीच फळं आज मी भोगतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
२००९ ला ऑफर होतीपवार यांनी मला २००९ ला ऑफर दिली होती. शिरूरमधून लढू नका, मला तिकडून लढायचं आहे. तुम्हाला दोन टर्म राज्यसभा देतो. ही मीटिंग २४/११ ला झाली होती. त्यावेळी मी बाळासाहेबांवर विश्वास आहे असं सांगितलं. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आज खासदार नसताना शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी लढत असल्याचंही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांनी शांत राहावं. पक्षाविरोधी काही करू नका. आपण बसू. चर्चा करू आणि निर्णय घेऊ अशी सर्वांना विनंती आहे. जनतेनं मला मोठं केलंय. जनता निर्णय घेईल, बघू पुढे काय करायचं ते असंही ते म्हणाले.