अहेरी/आलापल्ली (गडचिरोली) : छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात साध्या वेशात आलेल्या सुमारे सहा नक्षलवाद्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची गोळ््या घालून हत्या केली. दुपारी दीड वाजता ही घटना घडली. नागोसे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत. डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार आदींसह अहेरी व आलापल्ली लोक उपस्थित होते. अॅड. उदयप्रकाश गलबले मार्गदर्शन करीत असताना मंचाच्या मागच्या बाजूला अचानक फटाके फोडल्यासारखा आवाज झाला. त्यामुळे लोक आवाजाच्या दिशेने गेले. तेव्हा सहा शस्त्रधारी नक्षलवादी हे पोलीस हवालदार नानाजी बारकुजी नागोसे (४५) यांच्यावर गोळीबार करताना त्यांना दिसले. त्यांच्यावर आठ गोळ््या झाडण्यात आल्या. घटनेच्या दहा मिनिटांपूर्वी नानाजी नागोसे हे मंचावर उपस्थित होते. ते मंचावरून बाजूला गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. नक्षलवादी नागोसे यांची रायफल व काडतूस घेऊन जंगलाच्या दिशेने पळून गेले. आत्राम यांनी रेपनपल्ली पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. नागोसे यांचे पार्थिव रेपनपल्ली येथून गडचिरोली पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)
माजी आमदाराच्या अंगरक्षकाची हत्या
By admin | Published: April 15, 2016 2:08 AM