मुंबईःमुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी गुरुवारी(दि.19) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मीडियाला संबोधित करताना संजय पांडे म्हणाले की, त्यांना 2004 पासून काँग्रेसमध्ये यायचे होते, पण आता योग्य वेळ आली आहे.
राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा यावेळी राज्यात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा संजय पांडे यांनी केला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सर्वसामान्यांना घाबरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यावेळी महायुतीवर (एनडीए) टीका करताना त्यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचेही म्हटले. दरम्यान, संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणत्या मतदारसंघातून संधी दिली जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे हे मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या जागेवर सध्या भाजपाचा आमदार आहेत. तर, याच मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजूल पटेल यादेखील उत्सुक आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत 32 हजार मते घेतली होती. 2009 साली या मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली होती. त्यानंतर 2014 आणि 2019 या काळात भाजपाच्या भारती लव्हेकर या मतदारसंघात निवडून आल्या. आता वर्सोवा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अटक2009 ते 2017 या कालावधीत NSE कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ED ने जुलै 2022 मध्ये अटक केली होती. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय पांडेंना डिसेंबर 2022 मध्ये जामीन मिळाला. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच महाराष्ट्राचे डीजीपी राहिले आहेत. संजय पांडे हे शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात.