महाआघाडीत पुन्हा बिघाडी? आव्हाडांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या 'त्या' विधानानं नव्या वादाला फोडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 10:09 PM2020-01-29T22:09:13+5:302020-01-29T22:12:27+5:30
जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं नवा वाद होण्याची शक्यता
मुंबई: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे महाआघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य आव्हाड यांनी बीडच्या संविधान महासभेत केलं. या विधानावरुन काँग्रेस हायकमांडकडून काय भूमिका घेतली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. मात्र अहमदाबाद, पाटण्यातल्या विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवली होती. यानंतर जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन पुकारलं होतं. आताही देशात तशीच परिस्थिती आहे. जेएनयू, जामिया, जादवपूर विद्यापीठांचे विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ते थेट सरकारला आव्हान देत आहेत. लोकांना कायदा समजवून सांगत आहेत. आता त्यांची संख्या कमी असेल. मात्र यातूनच नवे नेते घडतील,' असं आव्हाड यांनी संविधान महासभेला संबोधित करताना केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेलादेखील या वादात ओढण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड खरं बोलले. त्यांच्या विधानाशी शरद पवार आणि शिवसेना सहमत असेल, असं सोमय्या यांनी म्हटलं.
याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन मोठा वाद झाला होता. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला पायधुनीमध्ये भेटायला जायच्या, असा खळबळजनक दावा राऊत यांनी लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केला होता. या विधानाबद्दल काँग्रेसकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. यानंतर राऊत यांनी त्यांचं विधान मागे घेतलं.