मुंबई : मुंबईतील लोकल प्रवास करताना प्रवाशांना नेमक्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते, हे पाहण्यासाठी संसद स्थायी समिती अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी समिती सदस्यांसोबत (खासदार) लोकलने प्रवास केला आणि या प्रवासात अध्यक्षांसह सदस्यांना गर्दीचा आणि प्लॅटफॉर्म गॅपचा सामना करावा लागला. या गर्दीत अध्यक्षांसह सदस्य हरवून गेले. तर लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅप पाहता सगळ्यांनी तोंडात बोटे घातली. संसद स्थायी समिती अध्यक्ष दिनेश त्रिवेदी आणि सोबत असलेले खासदार संजय धोत्रे, कुंवर चांडेल आणि अन्य एका सदस्यासोबत चर्चगेट येथून रेल्वेने गर्दीच्या वेळेत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्रिवेदी यांनी स्वत:चे आणि सदस्यांचे फर्स्ट क्लासचे लोकल तिकिट काढले आणि प्रथम धीम्या लोकलमध्ये जाऊन बसले. मात्र या लोकलमध्ये चढतान त्यांना लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपचा मोठा सामना करावा लागला. तर सदस्यांची लोकलमध्ये चढतना बरीच तारांबळ उडाली. हा एवढा मोठा गॅप कसा काय असा सवाल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना विचारला. यावर काम सुरु असल्याचे सावध उत्तर उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. मात्र यामुळे प्रवाशांना किती मनस्ताप होत असेल अशी सर्वच सदस्यांनी खंत व्यक्त केली. दादर स्थानक येताच लोकलमध्ये चढण्यासाठी दादर स्थानकातील प्रवाशांनी एकच गर्दी केली होती आणि ही गर्दी अंगावर येताच त्रिवेदी यांच्यासह खासदारांची एकच पळापळ झाली. (प्रतिनिधी)
माजी रेल्वेमंत्री, समिती सदस्य हरवले गर्दीत
By admin | Published: February 13, 2015 1:50 AM