ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - माजी रणजीपटू अमोल जिचकारने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याने नुकताच मित्रासोबत रेस्टॉरंट सुरू केले होते, अशी माहितीही मिळाली आहे.
नागपूरमध्ये जन्मलेला ३८ वर्षीय अमोल जिचकार रणजी स्पर्धेत विदर्भाकडून खेळला होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा सामन्यांमध्ये ३.६४ इकॉनॉमी रेटने ७ विकेट घेतल्या होत्या. १९९८ ते २००२ या चार वर्षात तो क्रिकेटमध्ये सक्रीय होता. तसेच अंडर १९ संघामध्येही तो खेळला होता.
अमोल सध्या नागपूरमधील सिव्हील लाईन्स परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये नागपूरमध्ये रेस्टॉरंट सुरू केले होते. विपुल पांडे या मित्रासोबत त्याने हा व्यवसाय सुरू केला होता. विपुल पांडे हादेखील माजी क्रिकेटपटू आहे. लॉ कॉलेज चौकात या दोघांनी रेस्टॉरंट होते.
अमोल जिचकारचे आईवडील सध्या पुण्यात आहे. अमोलला एका मुलगादेखील आहे. या घटनेने जिचकार कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला आहे. संध्याकाळी अंबाझारी येथील स्मशानभूमीत अमोलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.