जयंत धुळप, अलिबागमुरुड तालुक्यातील एकदरा गावातील सात कुटुंबांना वाळीत टाकणारा आणि याच्या वार्तांकनासाठी आलेल्यांवर हल्ले करणारा माजी सरपंच मोतीराम चाया पाटील याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उप विभागीय दंडाधिकारी दीपक क्षीरसागर यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश दिल्यानंतर तात्काळ कारवाई केल्याचे मुरुड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मोतीराम हे एकदारा कोळी जातपंचायतीचे अध्यक्ष असताना त्यांनी हनुमान मच्छिमार सहकार संस्थेतील आर्थिक भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठविणारे रश्मिकांत पाटील यांना २००७मध्ये वाळीत टाकले. त्यांच्या दहशतीमुळे पाटील यांना गाव सोडून मुंबईला जावे लागले. याप्रकरणी पोलिसांना जबाब देणाऱ्या जगन्नाथ वाघरे यांनीही वाळीत टाकले. ५ फेबुवारी २००७ पासून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर २००९ मध्ये गुणेश दामशेट, नारायण पाटील, अरुण मढवी, नारायण वाघरे, जगदीश दामसे या सहा कुटूंबांना मोतीराम पाटील याने वाळीत टाकले आहे.
वाळीत टाकणारा माजी सरपंच तडीपार
By admin | Published: February 13, 2015 1:30 AM