आकोट (अकोला) : शिवसेनेचे माजी आमदार रामाभाऊ उर्फ रामेश्वर वासुदेव कराळे यांचे शनिवारी सकाळी आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रामाभाऊ कराळे यांनी १९८६ मध्ये शिवसेनेचा झंझावात अकोला जिल्ह्यातील आकोट विधानसभा मतदारसंघात पोहोचवला. त्यानंतर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शिपाईपदाचा राजीनामा देऊन ते राजकारण, समाजकारणात सक्रिय झाले. जिल्ह्यात गाव तेथे शाखा स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. १९९५ साली ते विधानसभेच्या आकोट मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. जून १९९५मध्ये ते सहकारी सुतगिरीणीचे मुख्य प्रशासक झाले. त्यांनी आदीवासीबहुल भागात भरपूर कार्य केले. दरम्यान, काही दिवसांपासून त्यांना किडनीचा आजार जडला होता. अकोला येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला.
शिवसेनेचे माजी आमदार रामाभाऊ कराळे यांचे निधन
By admin | Published: March 13, 2016 1:57 AM