मनसे आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करत असताना औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. याआधी देखील मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसीय औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी उचलून धरत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातच आता यांनी देखील जर दोन महिन्यात औरंगाबादचं नाव संभाजीनगर न केल्यास शहरात फिरु देणार नाही असा इशारा मनसेचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला आहे.
औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले असल्याचे सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेला टोला लगावला होता. तसेच आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यासाठी मनसे आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचंही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले होते.
चंद्रकांत खैरे तुमचा राज्यात मुख्यमंत्री आहे. तसेच येत्या दोन महिन्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही केले केले नाही तर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकांच्या काळात संभाजीनगर नाव घेऊन प्रचाराला येता येणार नाही. मतदान मागता येणार नाही. तसेच दोन महिन्यात जर संभाजीनगर नाव केले नाही तर संभाजीनगरमध्ये फिरु देणार नाही असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांना दिला आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी होती. संभाजीनगर नावाची मागणी मनसे करतेय त्यांनी हा मुद्दा टिकवला पाहिजे. कारण त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. मनसे आता बोलायला लागली आहे. आम्ही आधीपासून संभाजीनगर बोलतो. आता अधिकृतपणे मुख्यमंत्री निर्णय घेतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक उडणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसून येत आहे.