लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन भागवत पायघन (५५) यांची अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. ही घटना हिंगोली मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील खासगी गोडाऊनसमोर २६ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. अंजनखेडा (ता. जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे घोडबाभूळ शिवारातील शेताकडे सकाळी फेरफटका मारायला गेले होते. शेताकडे जात असताना अज्ञात इसमांनी तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर पायघन यांच्या बोटामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या, साखळी असा एकूण २ लाखांचा ऐवजही लंपास केला. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर घटनास्थळावर फिंगर प्रिंट तज्ज्ञ व अकोला येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार चाकी वाहनाचा वापर पायघन यांची हत्या करण्याकरिता अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनाचा वापर केल्याचे घटनास्थळावरील प्रथमदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. या वाहनाने एका विजेच्या खांबाला धडक दिल्याने वाहनाच्या काचा फुटून घटनास्थळावर पडल्या व खांबही चांगलाच झुकला गेला. सोने लंपास करून दिशाभूल करण्याचा हेतू? पायघन यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने लंपास करण्यामागेही हत्यारांचा पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा हेतू असू शकतो. पायघन यांच्या हत्येमागे ‘अनैतिक’ संबंधाचेही कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात उपसरपंचाच्या हत्येची दुसरी घटना कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच विलास पोटपिटे यांची दादगाव शेतशिवारात ५ एप्रिल रोजी हत्या झाली होती. याच्या तपासादरम्यान १८ मेपर्यंत दोन आरोपींना अटक झाली असून, पुढील तपास सुरू असताना २६ मे रोजी अंजनखेडा येथील माजी उपसरपंचाची हत्या घडल्याची दुसरी घटना घडली.
माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या
By admin | Published: May 27, 2017 12:21 AM