शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय मंत्र्यांची अजितदादांना साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 11:20 AM2023-07-09T11:20:53+5:302023-07-09T11:23:47+5:30
Sharad Pawar Vs Aji Pawar: या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sharad Pawar Vs Aji Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून, शरद पवार यांनी राज्यचा दौरा सुरू केला आहे. शरद पवार यांना एकामागून एक धक्के बसत असल्याचे दिसत आहे. आता एका माजी मंत्र्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या पन्नास मुख्य पदाधिकाऱ्यांसह सामुहिक राजीनामा दिला आहे.सुबोध मोहिते हे रामटेकमधून खासदार होते. राजीनामा देताना आपण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुबोध मोहिते यांनी आपल्या पदाधिकांऱ्यासह राजीनामा दिला. मोहिते यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक आमदार अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत
अजित पवार यांनी शिवसेना भाजप यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. अनेक आमदार अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत. तर अनेकांनी शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याचे सांगून अजित पवार यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. त्यातील पहिली सभा नाशिकच्या येवल्यात पार पडली.