- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मवाळ भूमिका घेत, आपले मौन सोडले असून, आपल्या पक्षाच्या नेत्यांना फॉर्म्युल्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करायला सांगितले आहे. ही चर्चाबुधवारीच होणार असून, आता लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी होणारी बैठक इंदिरा गांधी जयंतीच्या कार्यक्रमांमुळे रद्द झाली. मात्र, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल व के. सी. वेणुगोपाल यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याच्या विविध शक्यतांवर त्यांच्याच चर्चा झाली, तसेच आपण शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा न दिल्यास काँग्रेसचे आमदार बाहेर पडतील, अशी शक्यताही या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतरच, सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात आले. दोन्ही काँग्रेसच्या उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्यांशीही चर्चा होणार आहे. त्यात फॉर्म्युला नक्की झाल्यावर सरकार स्थापनेबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल.शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सोनिया गांधी यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली. हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हक्क ही शिवसेनेची मूळ भूमिका आहे आणि ती आपल्या विचारसरणीच्या आड येणार नाही, असे या नेत्यांनी त्यांना सांगितले, तसेच एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर या अडचणी राहणार नाहीत, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ए. के. अँथनी, के. सी. वेणुगोपाल आदी नेत्यांचा बिगरमराठी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्यास विरोध आहे, पण ती भूमिका आता कालबाह्य ठरल्याचे नेत्यांनी सोनिया गांधी यांना पटवून सांगितले.सरकार आमचेच - संजय राऊतशिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट झालेले असेल. शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे निरनिराळे अर्थ लावले जात असल्याकडे लक्ष वेधता ते म्हणाले की, पवारसाहेबांना समजण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेविषयी कोणी चिंता करण्याचे कारण नाही. कारण आम्ही सरकार स्थापन करणारच.