- गौरव भांदिर्गेगडावर जाण्याच्या वाटा ...पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे खासगी वाहनाने थेट गडावर जाता येते.पायी जाणाऱ्यांसाठी...पुणे महानगरपालिकेच्या बसने स्वारगेटपासून हातकरवाडीत जावे. हातकरवाडीतून मळलेली पाऊलवाट आपल्याला २ तासांत गडावर घेऊन जाते. गडदर्शन...वाहनतळापासून सरळ गेल्यावर उत्तरेला पुणे दरवाजा लागतो. असे हे एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. तिसरा दरवाजा यादवकालीन आहे. येथे पट्टीवर कमळे कोरलेली आहेत. येथून डाव्या बाजूस गेल्यावर ३५ ते ४० फूट उंचीचा खंदकडा लागतो. पुन्हा आल्यावाटेने थोडे मागे गेल्यावर खडकात खोदलेल्या घोडेपागा पाहायला मिळतात. खडकातील खिंडीतून गेल्यावर एक कुंड, गणेश टाके, रत्नशाळा, दारूखान्याची इमारत पाहायला मिळते. तेथून पुढे उजव्या बाजूला गेल्यावर टिळक बंगला व उजव्या बाजूने गेल्यावर राजाराम महाराजांची समाधी लागते. वर चढल्यावर कोंढाणेश्वर मंदिर व बाजूलाच छोट्या चौथऱ्यावर हाताची प्रतिमा तयार केली आहे. असे सांगितले जाते की येथेच तानाजी मालुसरे यांचा लढताना हात तुटला होता. पुढे गेल्यावर तानाजी मालुसरेंचे स्मारक लागते व थोडे खाली गेल्यावर अमृतेश्वराचे मंदिर व देव टाके लागते. तेथून कड्याकड्याने गेल्यावर आपण दोन भव्य कल्याण दरवाजांत पोहोचतो. यापैकी दुसऱ्या दरवाजात पहारेकऱ्यांच्या देवड्या व चौकटीवर पंखविहिन केवल शरभ व अर्धव्यक्तगज कोरलेले दिसतात. तसेच पुढे गेल्यावर उदयभानाचे थडगे झुंजार बुरूज पाहायला मिळतात. तटातटाने गेल्यावर डोणगिरीचा कडा, कलावंतीण बुरूज पाहायला मिळतात.इतिहास...कौंडिण्य ऋषींच्या नावावरून या किल्ल्याला कोंढाणा हे नाव रूढ झाले. हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंढाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. पुढे इ.स. १६४९मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगडही होता. सिंहगड हा मुख्यत: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्रा येथून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले व कोंढाणा काबीजसुद्धा केला. पण त्यांना या युद्धात वीरमरण आले. या युद्धाबाबत सभासद बखरीत उल्लेख आढळतो. तानाजीच्या मृत्यूनंतर ‘सिंहगड’ हे नाव पडले हे खरे नव्हे, कारण शिवरायांनी तानाजीच्या मृत्यूपूर्वी सात वर्षांअगोदरच्या दानपत्रात या गडाचा उल्लेख ‘सिंहगड’ असाच केला आहे. इ.स. १६८९च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंढाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. पुढे इ.स. १७०३च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव बक्षिंदाबक्ष (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात घेतला. पुढे १८१८मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.