मुंबई : दारूच्या नशेत जान्हवी गडकरने इस्टर्न फ्री-वेवर केलेला अपघात डोळयांनी पाहाणारा व तो पाहून सर्वप्रथम मदतीचा हात पुढे करणारा एक टॅक्सीचालक आज स्वत:हून आरसीएफ पोलीस ठाण्यात आला. अब्दुल हाफीज खान(५०) असे त्याचे नाव असून आरसीएफ पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.हाफीज ८ जूनला पत्नी, तीन मुली व जावई यांना घेऊन मरिनड्राईव्ह, गे-टवे आॅफ इंडिया परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथून ते फ्री-वेवरून परतत होते. तेव्हा त्यांनी फ्री-वेच्या विरूद्ध दिशेने चेंबुरकडे जाणारी लाल रंगाची कार पाहिली. त्यांनी ही बाब गाडीतल्या सर्वांनाच दाखवली. लाल रंगाची कार अत्यंत वेगात आणि वेडीवाकडी प्रवास करत होती. ही गाडी पांजरापोळच्या दिशेने आॅरेंज गेटकडे जाणाऱ्या दोन वाहनांना ठोकणार होती. मात्र सतर्क चालकांनी कशीबशी आपापली गाडी वाचवली आणि पुढे निघून गेले. काही अंतर गेल्यावर मोठा आवाज झाला. लाल रंगाच्या गाडीने समोरून येणाऱ्या वाहनाला ठोकले होते. या धडकेचा आवाजही हाफीज यांनी ऐकला. जवळ जाऊन पाहिले तेव्हा लाल रंगाची गाडी आॅडी असल्याचे दिसले. ही आॅडी ओमिनी टॅक्सीवर चढलेल्या अवस्थेत होती. रस्त्यावर काचा पडल्या होत्या आणि आतून जखमींचे विव्हळणे ऐकू येत होते, असे हाफीज यांनी पोलिसांना सांगितले आहे.त्या अपघातग्रस्त दोन गाडयांकडे जाणारे हाफीज आणि त्यांचे जावई पहिले साक्षीदार होते. मागून आलेल्या वाहनांमधून उतरलेल्या काहींनी लगोलग बचाव कार्य सुरू केले. टॅक्सीतील साबूवाला कुटुंबातल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. एअरबॅगमुळे वाचलेल्या जान्हवीलाही आम्हीच बाहेर काढले, असे हाफीज यांनी पोलिसांना सांगितले आहे.गाडीतून बाहेर काढल्यानंतर कपडेही सांभाळण्याची शुद्ध जान्हवीत नव्हती. तिला अपघाताची जाणीवही नव्हती, इतकी ती नशेत होती. घटनेनंतर तब्बल ४० मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, असेही हाफीज यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. एक स्वतंत्र साक्षीदार समोर आला आहे. या साक्षीदाराच्या जबाबाप्रमाणे तो या अपघाताला प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे त्याचा जबाब खटल्यासाठी महत्वाचा ठरेल, अशी माहिती परिमंडळ सहाचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. (प्रतिनिधी) बघ्यांची नुसतीच गर्दीअपघात झाला तेथे दोन्ही बाजुला रहिवाशी वस्ती आहे. या वस्तीतीले रहिवासी अपघातानंतरच्या हालचाली फक्त पाहात होते. मात्र मदतीला कोणीच पुढे येत नव्हते, अशी माहिती हाफीज यांनी पोलिसांना दिल्याचे समजते.-मरिन प्लाझा हॉटेलमध्ये सहा पेग रिचवल्यानंतर फोर्टमधल्या आयरीश हाऊस बारमध्ये गेलेल्या जान्हवी गडकरने रिलायन्स कंपनीत मोठया पदावर काम करणाऱ्या आलोककुमार अगरवाल यांच्यासोबत आणखी मद्यप्राशन केले होते. -सुमारे दोन तास या बारमध्ये जान्हवी आणि अलोक सोबत होते. तेथे हे दोघे बीअर प्यायले. हॉटेलच्या सीसीटीव्हींमध्ये जान्हवी तेथे उपस्थित होती हे स्पष्ट झाले आहे. -या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी अगरवाल यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी त्यांचा जबाब नोंद होईल. अगरवाल रिलायन्सचे चीफ फायनान्शीअल आॅफीसर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
फ्री-वे अपघाताचा साक्षीदार सापडला
By admin | Published: June 14, 2015 1:55 AM