परभणी : येथील रहेमतनगरातील मोहम्मदीया मशीद बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींची परभणीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गुरुवारी सायंकाळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. जवळकर यांनी हा निकाल दिला.शहरातील मोहम्मदीया मशिदीमध्ये २१ नोव्हेंबर २००३ रोजी दोन दुचाकीस्वारांनी क्रूडबॉम्बचा स्फोट केला होता. यात एक ठार तर ३४ जण जखमी झाले होते. २००६मध्ये नांदेड येथील तरोडा नाका परिसरात बॉम्ब तयार करताना स्फोट झाला होता. त्यात हिमांशू पानसे आणि नरेश हे दोघे मृत पावले होते, तर मारोती वाघ हा जखमी झाला होता. मारोतीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हे बॉम्बस्फोट प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात संजय चौधरी, योगेश देशपांडे आणि राकेश धावडे यांचाही सहभाग असल्याचे तपासात पुढे आल्याने चौघांनाही पोलिसांनी अटक केली होती. तपासादरम्यान संजय चौधरी यांची नार्को टेस्टदेखील करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने हा खटला सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे चालविला. पण सरकार पक्षाने सक्षम पुरावा सादर न केल्याने संशयाचा फायदा देत न्यायालयाने चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. (प्रतिनिधी)- निकाल जाहीर करताना आरोपी मारोती वाघ, संजय चौधरी, योगेश देशपांडे हे न्यायालयात उपस्थित होते. तर राकेश धावडे याच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटाचाही आरोप असल्याने तो कारागृहात आहे.
चारही आरोपी निर्दोष
By admin | Published: August 19, 2016 3:58 AM