ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 31 - लातूर-बार्शी रस्त्यावरील नवीन एमआयडीसीत असलेल्या कीर्ती आॅईल मिलमध्ये सोमवारी रात्री वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कीर्ती आॅईल मिलचे मालक, ठेकेदार याच्यासह अन्य तिघे अशा पाचजणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आॅईल मिलच्या मालकासह चौघांना अटक केली आहे.
लातूर शहरातील नवीन एमआयडीसी परिसरात १२ नंबर पाटीनजिक असलेल्या कीर्ती आॅईल मिलमध्ये सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वेस्टेज सेटलमेंट टँकची स्वच्छता सुरू होती. यावेळी आॅईल मिलमधील कामगार या टँकची स्वच्छता करीत होते. या स्वच्छतेचा ठेका राम येरमे (रा. हरंगुळ) यांनी घेतला होता. दरम्यान, या टँकमधील रासायनिक गाळ काढत असताना त्यावर इलेक्ट्रिक मोटार होती. या मोटारीचे वायर उघडे होते. त्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू होता, एवढी माहिती असतानाही संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा करीत या कामगारांना टँकमधील गाळ काढण्यास सांगितले. दरम्यान, काम सुरू असताना दुर्घटना घडली. या टँकमध्ये नरेंद्र टेकाळे (रा. साखरा, जि. लातूर), दगडू शामराव पवार, बळीराम शामराव पवार (दोघे रा. नागझरी, ता.जि. लातूर), रामेश्वर दिगंबर शिंदे (रा. बोधेगाव, ता. परळी वैजनाथ, जि. बीड), राम नागनाथ येरमे (ठेकेदार, रा. हरंगुळ, ता.जि. लातूर), मारोती गायकवाड, शिवाजी अतकरे (दोघे रा. खंडापूर, ता.जि. लातूर), आकाश रामचंद्र भुसे (रा. गंगापूर, ता.जि. लातूर), परमेश्वर अरुण बिराजदार (रा. इंडिया नगर, लातूर) या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. यावेळी टँकची स्वच्छता करण्यासाठी दोर लावून आत उतरलेला नीलेश पंढरीनाथ शिंदे हा या दुर्घटनेतून बचावला आहे.
या प्रकरणी शिवराज पांडुरंग माने (२२, रा. पाखरसांगवी, ता.जि. लातूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आॅईल मिलचे मालक कीर्तीकुमार विष्णुदास भुतडा (रा. आदर्श कॉलनी लातूर), एकनाथ श्रीमंत केसरे (रा. विक्रम नगर, लातूर), मनोज वसंतराव क्षीरसागर (रा. वरवंटी, ता. लातूर), अंगद बब्रुवान गायकवाड (रा. लातूर) आणि मयत ठेकेदार राम नागनाथ येरमे यांच्याविरुद्ध कलम ३०४ (२), ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी ११.३१ वाजता यातील चौघांनाही अटक केली आहे.