- यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात मुंबईतील बडे बिल्डर व्योमेश शहा आणि अन्य तीन जणांना राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) आज अटक केली. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम याच्यासोबत केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. व्योमेश शहा हे हब टाऊन रिअॅल्टी लिमिटेड या कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्याशिवाय, रमेश कदमचा उजवा हात असलेला विलास भांडारकर तसेच कोमराल कंपनीचा माजी संचालक किरण काँट्रॅक्टर व विद्यमान संचालक सुहास डुंबरेंची सोमवारी सीआयडीच्या कार्यालयात सहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना गजाआड केले. रमेश कदमने पेडर रोडवर ८ हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी केला होता. तो ज्या कोमराल रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेडचा होता ती कंपनीच त्याने विकत घेतली. त्यात शहा यांच्या हब टाऊन कंपनीचे ५० टक्के शेअर होते. कदमने साठे महामंडळाच्या घोटाळ्यातील १०६ कोटी रुपये कोमराल कंपनीच्या खरेदीसाठी वळविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी व्योमेश शहासह चौघांना सीआयडीने आज अटक केली. किरण काँट्रॅक्टर आणि डुंबरे हे हब टाऊन कंपनीचे अधिकारी होते आणि त्याचवेळी ते कोमराल कंपनीचे संचालक होते. विलास भांडारकरलाही कोट्यवधींचा मलिदा मिळाल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. महामंडळाचे काम ठप्पया महामंडळातील घोटाळा लोकमतने उघडकीस आणला होता. घोटाळ्यांनी ग्रासलेल्या साठे महामंडळाचे कामकाज सध्या ठप्प आहे. कोणतेही कर्जवाटप केले जात नाही. त्यामुळे मातंग समाजात कमालीचा रोष आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीपैकी एक छदामही महामंडळाला अद्याप मिळालेला नाही.
बिल्डर व्योमेशसह चौघे गजाआड
By admin | Published: February 09, 2016 1:41 AM