भिवंडी : शहरातील अशिक्षित गिरणी कामगार व गरीब रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या चार बोगस डॉक्टरांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.गेल्या वर्षभरापासून टेमघर-भादवड परिसरांत बोगस डॉक्टर बेकायदेशीरपणे व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे येत होत्या. परंतु, या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध बहाणे करीत कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. शनिवारी मनपाचे डॉक्टर जयंत धुळे यांनी आपल्या पथकासह शांतीनगर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने टेमघर-भादवड परिसरांत चार ठिकाणी धाड टाकली. त्या प्रसंगी रुग्णांवर उपचार करण्याचा कोणताही परवाना नसताना अॅलोपथी औषधे बाळगून बोगसपणे वैद्यकीय व्यवसाय करताना वीरेंद्रकुमार कैलासनाथ पटेल, गोविंद कैलास भारद्वाज, लक्ष्मणकुमार रामप्रवेश मेहता व मुन्नालाल छबीराज यादव हे चार जण आढळून आले. या चौघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)
चार बोगस डॉक्टरांना अटक
By admin | Published: April 27, 2015 3:53 AM