लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला लावण्याच्या बहाण्याने चौघांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यानुसार चार महिन्यांपूर्वी अशाच गुन्ह्यात अटक केल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन हंबारराव पाटील याच्याविरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने स्वत:ला सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदावर नोकरीला असल्याचे सांगत इतरांनाही नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाची बनावट नियुक्तीपत्रे वाटल्याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी सचिन हंबारराव पाटील (३२) याला अटक केलेली आहे. तो मूळचा सांगलीचा राहणारा आहे. त्याच्याविरोधात ५० हून अनेकांनी नोकरीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली होती. त्याने स्वत:ला पी.डब्ल्यू.डी चा अधिकारी असल्याचे सांगून नोकरीचे आमिष दाखवले होते. त्यानुसार प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेवून त्यांना बनावट नियुक्तीपत्र देवून पाटील याने पळ काढला होता. पोलीस त्याच्या मागावर असतानाच खारघर येथे तो आला असता चार महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याने इतर चौघांची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड आहे. याप्रकरणी नेरुळचे सुनील पाटील यांच्या तक्रारीनुसार सचिन पाटील, त्याचे मामा व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील यांच्या शेजारी राहणाऱ्या बाबूराव कदम यांनी सचिन पाटील याच्यासोबत त्यांची ओळख करून दिली होती. या वेळी सचिन याने त्याचे नाव आर. डी. घाडगे असल्याचे सांगितले होते. या वेळी सुनील यांनी भाच्याच्या नोकरीसाठी त्याला दोन लाख रुपये दिले होते. काही दिवसातच नियुक्तीपत्र हाती आल्यामुळे त्यांनी जळगावमधील त्यांच्या इतर तिघा नातेवाइकांसाठी नोकरीची शिफारस केली होती. तर त्यांनाही सचिनने नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र दिल्यानंतर एकूण साडेचार लाख रुपये दिले होते.
नोकरीच्या बहाण्याने चौघांची फसवणूक
By admin | Published: July 11, 2017 3:32 AM