मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी राजकीय वर्तुळात भेटीगाठींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 4 बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर या नेत्यांनी कॅबिनेटच्या विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या मंत्रिमंडळातील सात जागा रिक्त आहेत. या जागा लवकरच भरल्या जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकीकडे भाजपाचे आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे चार बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांनी जवळपास अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चार बंडखोर नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर अहमदनगरमधून विजयी झाले.लवकरच होणाऱ्या कॅबिनेट विस्तारात सात जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी शिवसेना, भाजपा आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कॅबिनेट विस्तारात भाजपा आमदार आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे, प्रशांत बंब यांना स्थान मिळू शकतं. राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनादेखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि बंडखोर नेते विजयसिंह मोहिते यांना राज्यपालपद दिलं जाऊ शकतं.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 3:33 PM