जामखेड (अहमदनगर) : दुय्यम कारागृहाचे छत फोडून चार अट्टल दरोडेखोरांनी पलायन केल्याची घटना जामखेड येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. त्यानंतर दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके तत्काळ रवाना झाली. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, जामखेड तहसील कार्यालयात दुय्यम दर्जाची चार कारागृहे असून, त्यामध्ये पोलीस कोठडीतील ६ व न्यायालयीन कोठडीतील २६ असे एकूण ३२ आरोपी आहेत. शुक्रवारी रात्री १० ते १२च्या सुमारास राहुल शेळके यांनी पहाऱ्याचा चार्ज देण्यासाठी जी.बी. यादव यांना उठविले. चार्ज घेण्यापूर्वी यादव यांनी पाहणी केली असता क्रमांक ४च्या जेलमधून भरत विलास भोसले (२५, रा. पिंप्री, ता. आष्टी, जि. बीड), सुरेश ईश्वर भोसले (२०, रा. बेलगाव, ता. कर्जत), रावसाहेब विलास भोसले (३०), हकिम उर्फ विशाल नारायण भोसले (२०, रा. वाहिरा, ता. आष्टी) कारागृहात दिसले नाहीत. ते कारागृहाच्या बाथरूमवरील छताच्या लाकडी सिलिंग व लोखंडी जाळी तोडून त्यावरील कौले काढून पळून गेल्याचे निदर्शनास आले. चारपैकी एक पोलीस कोठडीतील तर इतर तीन न्यायालयीन कोठडीतील आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी चार पथके पाठविली आहेत. (प्रतिनिधी)दरोड्यातील गुन्हेगार भरत भोसले, सुरेश भोसले, रावसाहेब भोसले, विशाल भोसले यांच्यावर बीड, सोलापूर, नगर जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.गार्डप्रमुख अप्पा दिवटे आणि पोलीस कर्मचारी राहुल शेळके यांना कामात हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले.
जामखेड कारागृहातून चार दरोडेखोरांचे पलायन
By admin | Published: June 14, 2015 1:55 AM