सोलापूर, दि. २२ - औज बंधा-यातील स्थितीमुळे शहरात गेले आठ दिवस विस्कळीत झालेला पाणीपुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत होईल आणि 25 एप्रिलनंतर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी गुरुवारी सभेत दिली. महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारची तहकूब सभा गुरुवारी झाली. सभेत पाणी टंचाईवरील झालेल्या लक्षवेधीची चर्चा घेण्यात आली. अॅड. बेरिया, हेमगड्डी, सपाटे, सुरेश पाटील यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करता वितरण यंत्रणोत सुधारणा करून चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी सूचना मांडली.
सदस्यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेऊन आयुक्तांनी पाणीपुरवठय़ाबाबत घेतलेले निर्णय सभागृहापुढे मांडले.
औज बंधा-यातील पाणी 9 एप्रिल रोजी संपल्यावर पाणीटंचाई निर्माण झाली. शहराला 60 टक्के पाणीपुरवठा टाकळी योजनेतून होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तेव्हापासून प्रशासनाने पाणीपुरवठय़ासाठी कसोशीने प्रयत्न केले. आता औज बंधा-यात पाणी आले आहे. दोन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. पदाधिका-यांनी आग्रह केल्यामुळे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे बंधा-यातील पाणी 52 ते 55 दिवस पुरणार आहे.
भविष्याचा विचार करता पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी अपवादात्मक स्थितीत निर्णय घेतला जाईल. यासाठी शहरातील वितरण व्यवस्था सुधारणे, समान वितरण व वितरणाचा अवधी कमी करणे, पाण्याचा अपव्यय टाळणो,बोअर दुरुस्ती, जिथे पाणी जात नाही तेथे टँकर, टाक्यांचे वितरण तपासणो यावर भर दिला जाईल.