मुंबई : मुंबईत गेल्या पाच दिवसात स्वाइनचे चार बळी गेले आहेत. तापमानात वाढ होत असल्यामुळे एकीकडे रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. २८ ते ३१ मार्च दरम्यान हे मृत्यू झाले असून अकोल्याच्या तीन महिन्याच्या मुलाचाही स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. कल्याण येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय पुरूषाचा सायन रुग्णालयात २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या पुरूषाला २८ मार्चलाच सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्वसनयंत्रणेत बिघाड झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अंधेरी येथील ६४ वर्षीय महिलेचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला. २४ मार्च रोजी बीएसईएस रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. अकोला येथे राहणाऱ्या तीन महिन्याच्या मुलाचा ३१ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या मुलाला उपचारासाठी आधी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर २७ मार्चला त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले होते. मुलुंड येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय पुरूषाचा फोर्टीस रुग्णालायात मृत्यू झाला आहे. २० मार्चला त्याला अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २७ मार्चला त्याला फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आले. ३१ मार्चला या पुरुषाचा मृत्यू झाला. गेल्या २ दिवसांमध्ये मुंबईत स्वाइनचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबई बाहेरून १० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. मुंबई बाहेरून आलेल्या एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
चार दिवसांत स्वाइनचे चार बळी
By admin | Published: April 02, 2015 4:57 AM