ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणातील लेखा परीक्षण कंपनीच्या दहा जणांना अटक करण्यात आले. त्यापाठोपाठ रस्ता दुरुस्तीचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राट कंपनीच्या ४ सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे. संजय दिनानाथ सिंग (जे.कुमार-के. आर. कन्स्ट्रक्शन), सुनील चव्हाण (रेल्कॉन-आर. के. मधानी), संदिप जाधव(आरपीएस-के. आर. कन्स्ट्रक्शन), संथनवेल वेलमणी(आर. के. मधानी अॅण्ड कंपनी) अशी अटक सुपरवायझरची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ३१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या कंत्राट कंपन्यांनी महानगर पालिकेस आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन) आणि मोगम बिले सादर केली. ही सर्व कागदपत्रे आणि बीले एसजीएस इंडीया प्रा.लि. आणि इंडियन रजिस्टर आॅप शिपिंग या दोन कंपनीच्या लेखा परीक्षकांनी प्रमाणित करुन सादर केली होती. मात्र प्रत्यक्षात रस्ते बांधणी आणि दुरुस्ती झालीच नाही. यातच तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी मागील आठवड्यात १० लेखा परीक्षकांना अटक केली होती. परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते बांधणीसाठी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे काम सुरू आहे की नाही, हे पाहण्याची मुख्य जबाबदारी या चौघांची होती. तपासानुसार या चौघांनी ही जबाबदारी पार पाडलेली नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.