शरद पवारांसोबत चार तास चर्चा, विलीनीकरणाबाबत परिवहनमंत्री अनिल परब म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 04:37 PM2021-11-22T16:37:14+5:302021-11-22T16:40:22+5:30
आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अनेक प्रयत्न करुनही या संपावत तोडगा निघत नव्हता. त्यानंतर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागला. आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण, या बैठकीतही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
विविध मुद्द्यांवर चर्चा
या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. अनिल परब म्हणाले, 'गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे अनेकांचे हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर काय मार्ग निघू शकतात, त्यावर चर्चा केली. तसेच, एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रुळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजनांसह इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली', अशी माहिती परबांनी दिली.
न्यायालयाचा निर्णय मान्य असेल
परब पुढे म्हणाले, 'आजच्या बैठकीत वेतन वाढीसंदर्भातही चर्चा झाली, येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईलच. त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर या विषयावर चर्चा होईल. आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती आम्ही त्यांना दिली. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांवरही चर्चा आज केली. राहिला विषय एसटीच्या विलीनीकरणा, तर तो मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार ,' अशीही माहिती परब यांनी दिली.