एकनाथ पाटील / कोल्हापूरज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात सोळा महिन्यांत तब्बल चार अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्यात आला; तर तीन वकिलांची नियुक्ती करण्यात आली. तपास अधिकारी आणि वकील बदलाचा परिणाम तपासावर झाला आहे. आणखी काही महिन्यांत सध्याचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची पोलिस अधीक्षकपदी बढती होणार आहे. त्यामुळे हा तपास करवीरचे सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे सोपविण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. पानसरे हत्येच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यावर गृहविभागाने सोपविली होती. या तपासामध्ये त्यांनी २४ तास झोकून देत मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वर्षभरात त्यांची बढती होऊन त्यांच्या जागी अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून एस. चैतन्या रूजू झाले आणि तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्या कालावधीत दि. १६ सप्टेंबर २०१५ रोजी ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याला अटक झाली. त्यानंतर दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल झाले. सुरुवातीच्या काही कोल्हापूर, मुंबई येथील सुनावणीस चैतन्या हजर राहिले. त्यांचीही बढती झाल्याने प्रभारी तपास अधिकारी म्हणून गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना नियुक्त करण्यात आले.दरम्यानच्या कालावधीत ‘सीबीआय’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केली. पानसरे यांच्या हत्येमध्ये तावडेचा संबंध असल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांनी तपास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तावडेला अटक करण्यासाठी पूर्ण तयारी केली. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीला ते हजरही राहिले. तपास अधिकारी असल्याने त्यांनी पानसरे हत्येच्या तपासावर अत्यंत बारकाईने अभ्यास केला; परंतु रिक्त असलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे सुहेल शर्मा यांनी स्वीकारली आणि हा तपास त्यांच्याकडे गेला. शर्मा यांचे दोन महिने तपासाच्या अभ्यासात गेले. गेल्या सात-आठ महिन्यांत त्यांनी या तपासाची चांगली पकड निर्माण केली आहे; परंतु त्यांची काही महिन्यांत पोलिस अधीक्षकपदी बढती असल्याने त्यांच्या जागी नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे हा तपास जाणार आहे. अधिकारी बदलांचा परिणाम ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी करवीर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची या तपासकामासाठी मदत घेतली आहे.
दोन वर्षांत चार तपास अधिकारी, तीन वकील
By admin | Published: February 16, 2017 4:42 AM