गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : दस-यासाठी गुजरातला जाताना रविवारी संध्याकाळी तारापूर परिसरात कार दोन ट्रकमध्ये चिरडून चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघांपैकी तिघे मालवणीतील, तर एक महिला वर्सोवा येथील रहिवाशी होती. मंगळवारी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रफुल्ल बारड (३६), त्यांची पत्नी उषा (३४), काका बांजीभाई बारड (६२) आणि आत्या कांचन बारड (४३) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बारड कुटुंबीय मालवणीच्या राठोडी परिसरात कोटल निवासमध्ये राहत होते. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रफुल्ल त्यांच्या गाडीतून पत्नीसह गावी निघाले. ते स्वत: गाडी चालवत होते. काका बांजीभाई, वर्सोव्यातील आत्या कांचनही सोबत होत्या. गुजरातला नवरात्रीच्या घट विसर्जनासाठी ते निघाले होते. चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या आणि कारच्या मागून आलेल्या ट्रकच्या मध्ये कार चिरडून झालेल्या अपघातात चौघे मरण पावले.आम्ही घनिष्ट मित्र होतो. गावी जाण्याआधी रात्री साडेअकरा वाजता प्रफुल्ल मला भेटला. मात्र, गावी जातोय, असे काहीच बोलला नाही. रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास फोन वाजला आणि मित्राच्या मरणाचीच बातमी समजली. तो मला कायमचा सोडून गेलाय, यावर विश्वास बसत नाही, हे सांगताना प्रफुल्लचे जिवाभावाचे मित्र डायलन डायन उर्फ बंटू यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
कार अपघातात चौघांचा मृत्यू, तारापूरमधील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 5:40 AM