वर-वधू बचावले : नवरदेवाचे वाहन तिवसा टोल नाक्याजवळ उभ्या ट्रकवर आदळलेतिवसा (जि. अमरावती) : लग्न सोहळा आटोपून वधूला घेऊन जाताना नवरदेवाचे वाहन उभ्या ट्रकवर आदळल्याने चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा टोल नाक्याजवळ बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात नवरदेव-नवरी बचावले. वाशीम जिल्ह्यातील धुमका गावाहून हे वाहन नागपूर जिल्ह्यातील कोराडीसाठी निघाले होते. मृतांमध्ये वधूची मोठी बहीण ज्योती कवडू गुडधे (३५), आदित्य कवडू गुडधे (८) दोन्ही रा. अकोला, वराचा लहान भाऊ अंबादास दामोदर चंद्रशेखर (२४) व वाहन चालक रितेश प्रल्हाद उचीत (३५) दोन्ही रा. कोराडी यांचा समावेश आहे. वाशीम तालुक्यात धुमका गावात भगत व चंद्रशेखर परिवारात बुधवारी सकाळी लग्नसोहळा पार पडला. सायंकाळी ५ वाजता वधू-वरांना घेऊन झायलो कार राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून निघाली होते. बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास तिवसा टोलनाक्यालगत २00 मीटर अंतरावर टायर पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या ट्रक क्र. एमएच ४0 वाय ३७६७ या ट्रकला नवरदेवाच्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यात वाहनातील ३ जण जागीच ठार झाले. अंबादास चंद्रशेखर याचा अमरावतीला उपचारार्थ नेताना मृत्यू झाला. या अपघातात वर सुभाष दामोदर चंद्रशेखर (२९, रा. कोराडी), नववधू स्वाती सुभाष चंद्रशेखर (२0, रा. अकोला), रुतिका कवडू गुडधे (१२), कवडू महादेव गुडधे (४0, सर्व रा. अकोला) व रोषण देवानंद इंदूरकर (२५, रा. वाशीम) हे जखमी झाले. अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रकचा चालक व अज्ञात ट्रक चालकांविरुध्द तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संजय लाड तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
चार ठार, पाच गंभीर
By admin | Published: June 06, 2014 12:54 AM